केंद्र शासनाच्या निवडक कल्याणकारी योजनांचा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून अध्ययन : विशेष संदर्भ अमरावती जिल्हा (२०१६–२०२६)
India
Abstract
भारतातील आर्थिक विकास प्रक्रियेत कल्याणकारी योजनांना महत्त्वाचे स्थान आहे. आर्थिक विषमता कमी करणे, गरिबीचे निर्मूलन करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार देणे, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे आणि समाजातील वंचित घटकांचे जीवनमान सुधारणे या उद्दिष्टांनी केंद्र शासनामार्फत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. विशेषतः २०१४ नंतर आर्थिक समावेशन, कृषी क्षेत्र, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, गृहनिर्माण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये विविध योजनांना प्राधान्य देण्यात आले. प्रस्तुत संशोधन लेखाचा उद्देश केंद्र शासनाच्या निवडक कल्याणकारी योजनांचा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून आढावा घेणे हा आहे. या अभ्यासासाठी साहित्य समीक्षा पद्धतीचा वापर करण्यात आला असून, संबंधित संशोधन लेख, शासकीय अहवाल, धोरणविषयक दस्तऐवज आणि उपलब्ध दुय्यम माहितीच्या आधारे योजनांच्या उद्दिष्टांचे, लाभांचे आणि अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांचे विश्लेषण केले आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना, सुकन्या समृध्दी योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत विश्लेषणात या योजनांच्या व्यापक स्वरूपासोबतच विदर्भ व अमरावती जिल्ह्यासारख्या कृषी क्षेत्रातील स्थानिक वास्तवाचा विशेष संदर्भ विचारात घेण्यात आला आहे. कल्याणकारी योजनांचे मूल्यमापन केवळ लाभार्थ्यांची संख्या किंवा वितरित आर्थिक मदत यांच्या आधारे न करता, लाभांचे प्रत्यक्ष वितरण, लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीतील बदल, रोजगारनिर्मिती, सामाजिक सुरक्षितता आणि प्रादेशिक विषमता कमी करण्यातील योगदान या निकषांवर करणे आवश्यक आहे. योजनांच्या परिणामकारकतेसाठी प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता, जनजागृती आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा सुलभ प्रवेश महत्त्वाचा ठरतो. प्रस्तुत साहित्य समीक्षा कल्याणकारी योजनांच्या आर्थिक व सामाजिक परिणामांचे आकलन करण्यास, प्रादेशिक स्तरावरील अमंलबजावानीतील त्रुटी समजून घेण्यास आणि भविष्यातील संशोधनासाठी संभाव्य दिशा निश्चित करण्यास उपयुक्त ठरू शकते.
Keywords
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE