भारतीय अर्थव्यवस्थेवरील वित्तीय तुटीचा प्रभाव आणि सरकारी खर्चाचे सखोल विश्लेषण
India
Abstract
विकसनशील अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसाठी आणि स्थैर्यासाठी सरकारी खर्चाचे स्वरूप आणि वित्तीय तुटीचे (Fiscal Deficit) व्यवस्थापन हे अत्यंत कळीचे मुद्दे दिसून येतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास, वित्तीय तूट आणि तिचा देशाच्या सर्वांगीण विकासावरील परिणाम हा प्रदीर्घ काळापासून धोरणात्मक चर्चेचा आणि संशोधनाचा म्हणून समोर आला आहे. जेव्हा सरकारचा एका आर्थिक वर्षातील एकूण खर्च त्याच्या एकूण महसुलापेक्षा (कर्जे आणि देणी वगळून) जास्त असतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या स्थितीला 'वित्तीय तूट' असे म्हटले जाते. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला देशांतर्गत बाजारातून (बँका आणि वित्तीय संस्था) किंवा परकीय संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते, ज्याचा थेट परिणाम देशातील व्याजदर, चलनवाढ (महागाई) आणि खासगी गुंतवणुकीवर होताना दिसतो. आर्थिक सिद्धांतांच्या दृष्टिकोनातून, वित्तीय तुटीकडे पाहण्याचे प्रामुख्याने दोन मोठे प्रवाह आहेत: केनेशियन आणि निओ-क्लासिकल (Neoclassical). जॉन मेनार्ड केन्स यांच्या सिद्धांतानुसार, आर्थिक मंदीच्या काळात किंवा जेव्हा अर्थव्यवस्थेत मागणीची कमतरता असते, तेव्हा सरकारने तूट वाढवून सार्वजनिक खर्च केल्यास, एकूण मागणी (Aggregate Demand) वाढते आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. केनेशियन सिद्धांतानुसार, सरकारी खर्च हा अर्थव्यवस्थेतील मंदी दूर करण्यासाठी एक आवश्यक 'स्टिम्युलस' (Stimulus) म्हणून काम करतो. याउलट, विचार केल्यास आपल्याला आढळते कि, निओ-क्लासिकल सिद्धांताचा असा युक्तिवाद आहे की, सरकारी खर्चामुळे अर्थव्यवस्थेतील मर्यादित संसाधने शोषली जातात. जेव्हा सरकार मोठ्या प्रमाणावर बाजारातून कर्ज घेते, तेव्हा बँकांकडील कर्ज देण्यायोग्य निधी कमी होतो आणि व्याजदर वाढताना दिसतात. यामुळे खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी महागड्या दराने कर्ज घ्यावे लागते, परिणामी खासगी गुंतवणुकीला बाजारातून बाहेर ढकलले जाते (ज्याला 'Crowding Out' असे म्हणतात) आणि शेवटी महागाई वाढते. भारतासारख्या विकसनशील देशासाठी या दोन्ही सिद्धांतांचा सुवर्णमध्य साधणे अत्यंत आवश्यक आहे. भारताची अर्थव्यवस्था विकसित देशांपेक्षा वेगळी आहे, कारण येथे कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेली मोठी लोकसंख्या, भांडवलाची कमतरता आणि शिक्षण व आरोग्यासारख्या मूलभूत गरजांवर (Merit Goods) सरकारी हस्तक्षेपाची गरज यांसारख्या बाबींचा विचार करावा लागतो. जर वित्तीय तूट केवळ महसुली खर्चासाठी (Revenue Expenditure) उदा. वेतन, अनुदाने, कर्जमाफी किंवा व्याज भरण्यासाठी वापरली गेली, तर ती निओ-क्लासिकल सिद्धांतानुसार महागाई वाढवते आणि अर्थव्यवस्थेचे दीर्घकालीन नुकसान करते. मात्र, जर ही तूट भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) उदा. रस्ते, रेल्वे, धरणे, तंत्रज्ञान यासाठी वापरली गेली, तर केनेशियन सिद्धांतानुसार ती अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवते आणि दीर्घकालीन विकासाला गती देते. १९९१ च्या आर्थिक सुधारणांपूर्वी भारताची वित्तीय तूट जीडीपीच्या ८.४% पर्यंत गेली होती, ज्यामुळे देशाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. प्रस्तुत संशोधन प्रबंधात, भारताची सद्य वित्तीय स्थिती, सरकारी खर्चाचे बदलते स्वरूप, वित्तीय गुणक (Fiscal Multipliers), खासगी गुंतवणुकीवरील परिणाम आणि जागतिक रोखे बाजारातील घडामोडींचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.
How to Cite This Article
Rights
BODHIVRUKSHA JOURNAL OF DIVERSE DISCIPLINE