या संशोधनाचा मुख्य उद्देश AI आधारित ब्यूटी फिल्टर्स, फोटो-एन्हान्समेंट अॅप्स, तसेच सोशल मीडियावर प्रचलित असलेल्या व्हर्च्युअल ब्यूटी स्टँडर्ड्सचा युवकांच्या मानसिकतेवर होणारा एकत्रित परिणाम तपशीलवारपणे विशद करणे हा आहे. आधुनिक डिजिटल युगात AI-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्याचे आकार, त्वचेचा रंग, चेहरेवरील पोत, शरीरयष्टी किंवा भावनात्मक अभिव्यक्ती हे काही सेकंदांत बदलणे अत्यंत सोपे झाले आहे. ही कृत्रिम सुविधा सर्वसामान्य झाल्याने सौंदर्याची नवी, कृत्रिम व अवास्तव व्याख्या समाजात रूढ होत आहे. परिणामी, युवकांमध्ये स्वत:च्या नैसर्गिक रूपाबद्दल असमाधान, इतरांशी सतत तुलना करण्याची प्रवृत्ती, सामाजिकदबाव, आत्मविश्वासातील घट, तसेच फिल्टर्सच्या वापरावर मानसिक अवलंबित्व वाढताना दिसते. वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करून या अभ्यासात AI फिल्टर्सची तांत्रिक संरचना, त्यांची मानसशास्त्रीय परिणामकारकता, सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांवरील परिणाम, आणि युवकांच्या आत्मप्रतिमेतील सूक्ष्म बदलांचा विचार करण्यात आला आहे. या संशोधनातून कृत्रिम सौंदर्य निकषांनी निर्माण केलेले आभासी वास्तव आणि त्याचा मानसिक आरोग्य व सामाजिक वर्तनावर होणारा दूरगामी प्रभाव अधोरेखित केला आहे.